इचलकरंजी नगरीच्या प्रथम नागरिक अ‍ॅड. सौ. अलका अशोकराव स्वामी यांना कर्तबगार महिला सन्मान‘ आणि ‘सावित्रीबाई फुले’ पुरस्काराने गौरविण्यात आले.






इचलकरंजी/प्रतिनिधी -

जिजाऊ-सावित्री जयंती उत्सव आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत इचलकरंजी नगरीच्या प्रथम नागरिक अ‍ॅड. सौ. अलका अशोकराव स्वामी यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुजन फौंडेशन आदर्की बु॥ (ता. फलटण जि. सातारा) आणि ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्था खंडाळा यांच्यावतीने ‘कर्तबगार महिला सन्मान‘ आणि ‘सावित्रीबाई फुले’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मानचिन्ह, गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

सातारा जिल्ह्यातील सुजन फौंडेशन आणि ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्था यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात येतो. यंदाही जिजाऊ-सावित्री जयंती आणि जागतिक महिला दिनी या पुरस्काराचे वितरण केले जाते.

नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी नगराध्यक्षा म्हणून राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन यंदाच्या पुरस्कारासाठी सौ. स्वामी यांची निवड करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगांव येथे सावित्रीबाई फुले जयंती दिनी पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होतो. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव व ग्रामपंचायत निवडणूकीमुळे समारंभ होऊ शकला नाही.

सोमवारी सौ. स्वामी यांना सुजन फौंडेशनचे संस्थापक संपतराव जाधव, सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समितीच्या अध्यक्षा सौ. सुनंदा जाधव, सौ. सुप्रिया ननावरे, अजित जाधव यांनी हा पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेविका सौ. संगिता आलासे, महिला व बालकल्याण सभापती सौ. सारीका पाटील, नगरसेवक युवराज माळी, दिलीप मुथा, राहुल जानवेकर, राजू आलासे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post