सातारा पालिकेकडून बायोमेट्रिक नोंदीद्वारे हॉकर्सचे सर्वेक्षण सुरू.



सातारा शहरातील हॉकर्सची बायोमेट्रिक नोंद घेत त्यांच्या सर्वेक्षणाला सातारा नगरपालिकेने सुरुवात केली आहे. आजवर पाचशेहून अधिक हॉकर्सची नगरपालिकेकडे नोंद झाली असून, त्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर त्यांच्यासाठीचे झोन तयार करणे नगरपालिकेस सोपे जाणार आहे.

सातारा शहरातील प्रमुख भागात तसेच मार्गावर हॉकर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढणाऱ्या या संख्येमुळे अनेकदा प्रमुख भागात, तसेच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे नगरपालिकेने या हॉकर्सना व्यवसायासाठी काही महिन्यांपूर्वी जागा ठरवून दिल्या होत्या. या जागा व्यवसायासाठी अनुकूल नसल्याचे कारण सांगत हॉकर्सनी त्याठिकाणी जाण्यास नकार दर्शवला होता. हॉकर्समध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सातारा नगरपालिकेने आपल्या दप्तरात नोंद असणाऱ्या 540 हॉकर्सची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नगरपालिकेने यासाठी एका स्वतंत्र यंत्रणेची मदत घेतली असून आधार, पॅन, मतदान ओळखपत्रांसह संबंधित हॉकर्सचे फोटो काढून त्यांच्या जागा, इतर बाबींची तपासणी तसेच अंगठय़ांचे ठसेदेखील घेण्यात येत आहेत. लॉकडाऊनपूर्वी सुमारे 400 हून अधिक हॉकर्सची नोंद करण्यात आली होती. मात्र, नंतर काम रेंगाळले. अनलॉक प्रक्रियेनंतर नगरपालिकेने हे सर्वेक्षण पुन्हा गतिमान केले आहे. यासाठी हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान, शहराध्यक्ष संजय पवार, माजी नगरसेवक राम हादगे, संदीप माने, विनोद मोरे, सागर भोगावकर हे नगरपालिकेस मदत करत आहेत.सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आगामी काळात नगरपालिकेच्यावतीने हॉकर्सना जागा निश्चित करून देण्याबरोबरच ओळखपत्रे देण्याची कार्यवाही होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post