मास्क न घालणाऱ्या आणि सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहेत ....महापौर मुरलीधर मोहोळ



पुणे - शहरातील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मास्क न घालणाऱ्या आणि सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहेत, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सांगितले. सध्या लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, मात्र येत्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास शहराच्या काही भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे (मायक्रो कन्टेन्मेंट झोन) आणि काही प्रमाणात बंधने आणावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. महापालिका आयुक्‍तांसोबत तातडीची बैठक घेतली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उपमहापौर सरस्वती शेंडगे आणि सभागृह नेते गणेश बिडकर या वेळी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात 1,300 च्या आसपास असलेली करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,700 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हीटी दरही 4.6 टक्‍क्‍यांवरून 12 टक्‍क्‍यांवर गेला आहे. नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणची चाचणी केंद्रे, चाचण्यांचे प्रमाण आणि केंद्रावरील मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे.

ससूनसह पालिकेच्या रुग्णालयात 1,163 खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून, खासगी रुग्णालयांना खाटा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले. कोणत्याही परिस्थितीत करोना नियंत्रणात आणण्याचा निर्धार केला आहे, असे ते म्हणाले.करोनाची साथ अजून संपलेली नाही, त्यामुळे पुणेकरांनी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित वावर या करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे. नागरिक आरोग्याच्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.


- मुरलीधर मोहोळ, महापौर.

Post a Comment

Previous Post Next Post