चार तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींमध्ये आधीप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण कायम असणार पुणे – खेड, शिरुर, मावळ आणि बारामती या चार तालुक्‍यांतील सरपंचपदाच्या आरक्षणाच्या विषायावरून जिल्हाधिकारी यांनी अर्जदारांचे अपिल फेटाळल्यानंतर या तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार चार तालुक्‍यांत दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणावरून खेड, शिरुर, मावळ आणि बारामती या चार तालुक्‍यांतील 12 ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे यावर सुनावली झाली असता सरपंचपदाच्या आरक्षणाची तहसिलदार यांनी राबविलेली प्रक्रिया योग्य असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व अपिल फेटाळले आहे. त्यामुळे आता हा चार तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींमध्ये आधीप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण कायम असणार आहे.

तसेच, आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरपंच व उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच आवश्‍यक तो पोलिस बंदोबस्त देता यावा, यासाठी दोन टप्प्यात या निवडणुका होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

Post a comment

0 Comments