राज्य सरकारकडून जोपर्यंत स्पष्ट आदेश येत नाही, तोपर्यंत सभेचे कामकाज हे ऑनलाइनच सुरू राहील : महापौर.



पुणे - 'सोमवारच्या विशेष सभेसाठी कामकाजाच्या ठिकाणात बदल केला गेला होता. यासंदर्भात जाहीर निवेदन दिले गेले होते. तसेच ही सभा ऑनलाइन चालवण्यासंदर्भातही सर्व पक्षाच्या गटनेत्यांना विश्‍वासात घेतले गेले होते, असे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.यावेळी सभागृहनेते गणेश बीडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक दीपक पोटे आदी उपस्थित होते.

महापौर म्हणाले, 'राज्य सरकारकडून विशेष सभा 'ऑफलाइन' घेण्यासंदर्भात जो आदेश आला आहे, त्या आदेशाचा मान आम्ही राखला आहे, नियमानुसार ही सभा ऑनलाइन करण्याचे नियोजन होते, ही सभा मुख्य सभागृहात घेण्यासाठी पुन्हा एकदा जाहीर प्रकटन द्यावे लागले असते.त्यामुळे ही सभा तहकूब केली गेली आहे. मुख्य सभेचे कामकाज हे ऑफलाइन चालवण्यासंदर्भात राज्य सरकारकडून जोपर्यंत स्पष्ट आदेश येत नाही, तोपर्यंत सभेचे कामकाज हे ऑनलाइनच सुरू राहील,' असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

आजच्या सभेचे कामकाज हे ऑफलाइन घेण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिला होता. त्याचे पालन महापालिकेने केले नाही. या प्रकारे राज्य सरकारचा आदेश डावलणे चुकीचे आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून अनेक विषय मंजुरीसाठी प्रलंबित आहे. हे विषय मंजूर होणे त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सभेचे कामकाज ऑफलाइन करणे आवश्‍यक आहे.
- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या, मनपा


राज्य सरकारचा आदेश डावलून घेण्यात आलेली ही सभा बेकायदेशीर ठरू शकते. सभेचे ठिकाण बदलण्यासाठी मुख्य सभेमध्ये प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो. त्यांनी तो घेतला का? सत्ताधाऱ्यांना लपवालपवी करायची आहे. यापूर्वी झालेल्या ऑनलाइन सभेत का निर्णय घेतले नाही, त्या सभा का चालवल्या नाही. आमचे एक वर्ष तुम्ही वाया घालवले असे म्हणावे लागेल. त्यांना नेमके करायचे काय हेच कळत नाही, पण याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.
- पृथ्वीराज सुतार, गटनेते, शिवसेना

Post a Comment

Previous Post Next Post