पुणे : महापालिका : स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकाचा फुगा फोडला




पुणे : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रक सादर करून अद्याप आठवडाही झालेला नसतानाच; स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकाचा फुगा फोडला आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी सुमारे 7 हजार 650 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात, आयुक्तांनी पुणेकरांवर 11 टक्‍के मिळकतकर वाढ प्रस्तावित केली होती. ही करवाढ स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या खास सभेत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, या करवाढीतून आयुक्तांनी 131 कोटींचा महसूल गृहीत धरला होता. मात्र, स्थायीच्या निर्णयामुळे आयुक्तांचे अंदाज अवघ्या आवडयातच 131 कोटींनी चुकला आहे.


महापालिका आयुक्त कुमार यांनी अंदाजपत्रक सादर करताना; या करवाढीचे समर्थन केले होते.
गेल्या अनेक वर्षात प्रशासनाने कोणतीही करवाढ केलेली नाही. त्यामुळे, स्थायी समितीत प्रशासनाकडून करवाढ आवश्‍यक असल्याचे समजावून देऊन करवाढ़ रद्द केली जाणार नाही असा विश्‍वास आयुक्तांनी व्यक्त केला होता. मात्र, करवाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या खास सभेत समितीने ही करवाढ फेटाळून लावली आहे, करोना नंतरच्या आर्थिक संकटातून पुणेकरांवर करवाढ न लादता प्रशासनाने उत्पन्नाचे इतर स्त्रोत वाढवावेत तसेच थकबाकी वसूलीवर भर द्यावा अशा सूचना करत ही करवाढ फेटाळण्यात आली असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या करवाढीस महापालिकेच्या विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, रिपाईचे माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी करवाढीस विरोध करत प्रशासनाकडे करवाढ रद्द करण्याची मागणी केलेली होती.

Post a Comment

Previous Post Next Post