ससून रुग्णालयात ‍डॉक्टर असल्याचे सांगत 21 जणांना गंडा घालणाऱ्या कथित डॉक्‍टर भामट्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत 21 गुन्हे दाखल असून बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.



पुणे - ससून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्‍टर असल्याचे सांगत 21 जणांना गंडा घालणाऱ्या कथित डॉक्‍टर भामट्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत 21 गुन्हे दाखल असून बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अमित जगन्नाथ कांबळे (37, रा. निंबाळकरवाडी, नवी पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. ससून रुग्णालयात गंभीर आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून ससूनमधून डॉ. देशपांडे बोलतोय, असे तो सांगत होता. 'रुग्णाला तत्काळ इंजेक्‍शनची गरज आहे, संबंधीत इंजेक्‍शन रुग्णालयाच्या स्टॉकमध्ये उपलब्ध नाही. ते बाहेरून मागवावे लागणार आहे. मेडीकलवाले माझ्या ओळखीचे आहेत, तुम्ही बाहेरून इंजेक्‍शन घेतले, तर जास्त पैसे जातील.तुम्ही मला ऑनलाइन पैसे पाठवा मी तुम्हाला कमी किंमतीमध्ये इंजेक्‍शन मिळवून देतो', असे सांगून तो पैसे उकळत होता. यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फिर्यादी उमाशंकर तिवारी यांची 22 हजार रुपये व विजय गुदले यांनी 20 हजार रुपयांची त्याने फसवणूक केली होती. तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे त्याला ससून रुग्णालयातून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उपायुक्‍त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्‍त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार शेख, हरीष मोरे, संतोष पगार, पोलीस नाईक रुपेश पिसाल, अनिल कुसाळकर, कैलाश डुकरे, पोलीस शिपाई सागर घोरपडे, किरण तळेकर, अंकुश खानसोळे यांच्या पथकाने केली


शिक्षण पाचवी : शौक मोठमोठे

अमित कांबळे याचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. त्याला कुटुंब नाही. तसेच, घरदारही नाही. तो 2010 पासून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांत जाऊन तो रुग्णाच्या नातेवाईकांचे फोन नंबर मिळवून फसवणूक करत होता. फसवणूक करून मिळालेल्या रकमेतून तो मुंबईला जाऊन लॉजमध्ये राहात असे तसेच तमाशा व इतर शौक त्याला आहेत. दारुचेही व्यसन असून त्याच्यावर किडनीचे उपचार सुरू आहेत, त्याने अनेकांची फसवणूक केल्याची शक्‍यता असून फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक फड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post