कोंढवा परिसरातील श्री संत गाडगे महाराज शाळेतील एका शिक्षकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग, 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 'होम क्वारंटाईन' करण्यात आले पुणे  :  पुण्याच्या कोंढवा परिसरातील श्री संत गाडगे महाराज शाळेतील एका शिक्षकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. या घटनेनंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यात 4 जानेवारीपासून 9 वी ते 12 वीपर्यंतच वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यानंतर 5 वी ते 8 वीचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहेत. त्यादरम्यान आता शाळेतील शिक्षकालाच कोरोनाची बाधा झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ज्या शिक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे ते माध्यमिक शाळेत शिकवतात.दरम्यान, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशातील सर्वच शाळा गेल्या 10 महिन्यांपासून बंद होत्या. पण आता त्या टप्प्याने सुरु होत आहेत. त्यानंतर आता कोरोना व्हायरसचा संसर्ग एका शिक्षकालाच झाला आहे.

12 शिक्षकांचा रिपोर्ट अद्याप प्रतिक्षेत
या शाळेतील शिक्षकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 12 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. सध्या या सर्व शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहे.

शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची घेतली जातेय माहिती.

गेल्या आठवड्यात शाळेत हजर राहिलेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती घेतली जात असून, त्यांच्या प्रकृतीची माहितीही घेतली जात आहे. शाळा 5 दिवसांपासून बंद होती. त्यामुळे इतर कोणत्याही शिक्षकांना कोरोनाची लक्षणे नाहीत. तसेच जर कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील तर त्यांनी जवळच्या कोरोना सेंटरमध्ये जाऊन चाचणी करावी, असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments