कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका होणार की प्रशासकांची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष



देहूरोड -
 संरक्षण विभागाने देशभरातील 56 कॅंटोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाची अंमलबाजवणी 11 फेब्रुवारीपासून होणार आहे. दरम्यान, आता निवडणुका होणार की प्रशासकांची नियुक्‍ती केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संरक्षण मंत्रालयाचे उपसंचालक राजेश कुमार साह यांनी रक्षा संपदा विभागाच्या मुख्यालयाला याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार रक्षा संपदा महानिदेशनालयाकडून सहायक महानिदेशक दमन सिंग यांनी सदर्न कमांडसह देशभरातील पाच विभागीय मुख्यालयांना हे आदेश पाठविण्यात आले आहेत.

यामध्ये राज्यातील सात कॅंटोन्मेंट बोर्डासह पुणे जिल्ह्यातील पुणे, खडकी आणि देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे.त्यामुळे देशभरातील 56 कॅंटोन्मेंट बोर्ड सदस्यांचा कार्यकाळ 10 फेब्रुवारीपर्यंतच अस्तित्वात राहणार आहे. 11 फेब्रुवारीपासून बोर्ड बरखास्त होतील.

बरखास्तीचे आदेश दिलेले देशभरातील 56 कॅंटोन्मेंट बोर्ड 10 फेब्रुवारी 2015 अस्तित्वात आले होते. त्यांचा कार्यकाळ 10 फेब्रुवारी 2020 ला समाप्त झाला होता. त्यानंतर सहा-सहा महिन्यांसाठी दोन वेळा विद्यमान बोर्ड सदस्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ येत्या 10 फेब्रुवारीला संपुष्टात येणार होते.


दरम्यान, कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणूक लवकरात लवकर घेण्याबाबत कार्यवाही करावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषीत होण्याकडे विद्यमान बोर्ड सदस्य आणि निवडणुकांसाठी इच्छुक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. त्यात बोर्ड बरखास्तीची आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, आता निवडणुका होणार की प्रशासकांची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post