क्रिकेटपटू युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल



 नवी दिल्ली – भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरयाणा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटदरम्यान युवराजने एका समाजाबाबत जातीवाचक आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता. त्यामुळे या समाजाचा अपमान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

दलित समाजातील मानवाधिकार कार्यकर्ते व वकिल रजत कळसन यांनी युवराज विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून घेतला आहे. हरयाणातील हिसार जिल्ह्यातील हांसी पोलीस स्टेशनमध्ये युवराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी युवराज विरोधात कलम 153, 153 295, 505 नुसार गुन्हा दाखल केला आहे. लाइव्ह कार्यक्रमात युवराजने युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना उद्देशून जातीवाचक उल्लेख केला होता. युवराजच्या त्या शब्दाचा अनेक चाहत्यांनी निषेध केला आहे.

युवराजने लॉकडाउनदरम्यान अनेकदा लाइव्ह चॅटच्या माध्यमातून खेळाडू आणि चाहत्यांशी संवाद साधला. रोहित व युवराज यांच्यामध्ये लाइव्ह चॅट सुरू होता. त्यावेळी रोहित म्हणला की, आम्ही सर्वजण निवांत आहोत. चहल, कुलदीपही ऑनलाइन आले आहेत. त्यावर बोलताना युवराजने मस्करीत चहलबद्दल हा आक्षेपार्ह शब्द उच्चारला. त्यावर आता युवराजला लक्ष्य केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post