नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासह इतर सेलिब्रिटींवर निशाणा साधला



मुंबई |
 सध्या पेट्रोलच्या दराने काही राज्यांत 100 ओलांडली आहे तर काही राज्यांत आता काहीच दिवसात गाठण्याची शक्यता आहे. जनतेच्या मनातसुद्धा इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आक्रोश आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रसनेही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुपरस्टार अक्षय कुमार आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली आहे.

युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारं सरकार होतं म्हणून 70 रुपये लि.पेट्रोल झालं होतं. त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता.आता पेट्रोलने शंभरी गाठली, मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची हिम्मत नाही?, असं म्हणत नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासह इतर सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या पेट्रोल प्रति लिटर 96 रुपये तर डिझेल 86 रुपये लिटर झालं आहे तर घरगुती गॅस सिलेंडर 800 रुपये झाला आहे. कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. नोकरदार, मध्यम वर्गीयांनाही जगणं कठीण झालं आहे. त्यात दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली असून सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post