पेट्रोल, डिझेलमध्ये रस्ते कर वसूल केला जात असताना पथकर का भरायचा.... काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.



 मुंबई : देशात काही शहरात पेट्रोलच्या किंमती शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. देशातल्या विरोधी पक्षांनी यावरुन केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की आता यावर बोलणं म्हणजे धर्मसंकट आहे. त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर इंधन दरवाढीवरून कडाडून टीका केली.

पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर तब्बल १८ रुपये रस्ते कर वसूल केला जात आहे. तरी देखील पथकर अर्थात टोल वसूल करण्यात येतो. पेट्रोल, डिझेलमध्ये रस्ते कर वसूल केला जात असताना पथकर का भरायचा असा सवाल नाना पोटले यांनी केला.तसेच ही जनतेची दुहेरी लूट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पथकरवसुली बंद करा, अशी मागणी नाना पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परषिदेत केली.

एकीकडे केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर अवाजवी अबकारी कर लावून जनतेला लुटत आहे. त्यातच रस्ते विकास उपकराच्या नावाखाली १८ रुपये आणि कृषी उपकराच्या नावाखाली ४ रुपये असे तब्बल २२ रुपये प्रति लिटर पेट्रोल, डिझेलवर आकारले जात आहेत. रस्ते कराची आकारणी केली जात असताना पुन्हा राष्ट्रीय महामार्गावरील पथकराच्या माध्यमातूनही जनतेची लूट सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक तर रस्ते विकास कर बंद करावा किंवा देशभरातील पथकर बंद करावेत अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान २००१ ते २०१४ या १४ वर्षांच्या काळात रस्ते विकासासाठी पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया अधिभार लावला जात होता. २०१८ पासून केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधीच्या नावावर अधिभार १ रुपयांवरून १८ रुपये प्रतिलिटर करण्यात आल्याचे नाना पटोले यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर ४ रुपये कृषी उपकर घेतला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

Post a Comment

Previous Post Next Post