शाहूवाडीमधील पोलिसांच्या निवासस्थानाला एप्रिलमध्ये निश्चित मंजुरी दिली जाईल. गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाईकोल्हापूर : शाहूवाडीमधील पोलिसांच्या निवासस्थानाला एप्रिलमध्ये निश्चित मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी आज दिली.

शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव येथे आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे, वैद्यकीय अधिकारी निवासस्थान आणि प्राथमिक केंद्रीय शाळेच्या नुतन इमारतीचे लोकार्पण गृहराज्यमंत्री देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आज करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, सरपंच अमरसिंह पाटील आदी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, एका खासगी कार्यक्रमाला आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची सुंदर इमारत पहायला मिळाली.अत्यंत देखण्या इमारतीत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. त्यासाठी चांगली दृष्टी हवी. जोपर्यंत आपण चांगलं करत नाही तोपर्यंत सामान्य माणसाला खासगी दवाखना परवडणार नाही. त्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या करण्यावर आपण भर देवू. देशाचे लक्ष कोरोनाच्या काळात धारावी झोपडपट्टीवर लागून राहिले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शांत, संयमी वृत्तीने मुंबई महापालिका, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणा सक्षम ठेवून कोरोनाचा संसर्ग वाढू दिला नाही. एवढ्या मोठ्या संकटाला धाडसाने आणि धैर्याने शासन सामोरे गेलं.

कोरोना काळात धान्य वितरण, मोफत उपचार, गावागावात सॅनिटायझर या सगळ्या माध्यमातून जनतेचं रक्षण करण्यावर अधिक भर देण्यात आला. यापुढेही शाहूवाडी, पन्हाळ्यावर विकास कामासाठी नेहमीच लक्ष राहील आणि झुकतं माप राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

खासदार धैर्यशील माने यावेळी म्हणाले, 100 वर्षापूर्वीच्या शाळेच्या इमारतीने गावचा इतिहास पाहीला आहे. गावची जडणघडण पाहीली. याच शाळेच्या समोर नव्या इमारतीचे उद्धाटन सावित्रीच्या लेकींच्या हस्ते आज करण्यात आले. या गावाला त्यागाचा, विचाराचा आणि समर्पणाचा इतिहास आहे.

कोरोना काळात मुंबई, पुण्याहून येणाऱ्या माणसात दुरावा निर्माण झाला होता. याच आजाराने या काळात माणसाला माणूस म्हणून कसं काम करायचं हे दाखवून दिलं. आशा सेविका, आरोग्य सेवक, कर्मचारी, महसूल, पोलीस यंत्रणा ही सर्वप्रथम पुढे आलीत. मोठमोठी दवाखाने बंद झालीत. पण शासकीय दवाखाने अहोरात्र उपचार करण्यात सुरू होती. खासदार म्हणून पंतप्रधान सडक योजनेच्या कामात 70 कोटीच्या निधीत 126 किमीचे रस्ते करण्यात आपला सहभाग राहीला आहे. लस मिळाली म्हणून कोरोना संपणार नाही त्यासाठी काही दिवस आपण सर्वांनी दक्षता घेवू या.अध्यक्षीय भाषणात रात्रीचा दिवस करून काम करणारी सर्व मंडळी जिल्ह्याच्या उन्नतीसाठी मनापासून प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमाच्या उद्देशाने हाच संदेश पुढे घेवून कामाला लागू या, असे आवाहन बाबासाहेब पाटील यांनी केले.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, मुरलीधर जाधव, हंबीरराव पाटील यांची भाषणे झाली. सरपंच अमरसिंह पाटील यांनी आपल्या मानधनातून लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत पाच मुलींसाठी दामदुप्पट ठेव ठेवली आहे त्याचे वितरण यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती विजय खोत, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, डॉ. उषादेवी कुंभार, विजय देसाई, उपसभापती दिलीप पाटील, नामदेव गिरी, भिमराव पाटील, दत्ता राणे, स्नेहा जाधव, लता जाधव, अश्विनी जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments