इलाही जमादार यांना ' गझलसाद ' ची आदरांजली

 




कोल्हापूर ता.४ सुरेश भट यांना जी विजा घेऊन येणारी पिढी अपेक्षित होती त्या पिढीचे इलाही जमादार हे आघाडीचे गझलकार होते.भटांच्या नंतर निर्विवादपणे इलाहीजीनी मराठी गझल विश्वावर आपला खोलवर ठसा उमटविला.मराठी गझलेत नवे प्रयोग करून व आणून त्यांनी गझलेला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला.अनेक आशयघन रचनांनी मराठी गझल समृद्ध करणाऱ्या इलाही यांच्या निधनाने मराठी गझलेने एक सशक्त शायर गमावला आहे.त्यामुळे मराठी गझलविश्वाची मोठी हानी झाली आहे असे मत 'गझलसाद ,कोल्हापूर ' संस्थेच्या वतीने आयोजित सभेत व्यक्त करण्यात आले.इलाही जमादार कालवश झाल्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी व शोक व्यक्त करण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते.प्रारंभी इलाही जमादार यांच्या प्रतिमेला सुभाष नागेशकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.आणि दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

सभेच्या सुरुवातीस  प्रसाद कुलकर्णी यांनी इलाही जमादार यांच्या गझलांची, शेरांची अनेक उदाहरणे देत,त्यांचे वेगळेपण अधोरेखित करीत  मराठी गझलेतील योगदानाचा आणि त्यांच्याशी असलेल्या स्नेहसंबंधांचा सविस्तर आढावा घेतला. तर इलाही यांच्या गझलशिष्या डॉ. संजीवनी तोफखाने यांनी त्यांच्या आठवणी सांगून तसेच त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध उगलडून सांगत व त्यांच्या मराठी गझलेतील विविधांगी योगदानाचा उल्लेख करून समारोप केला.  ज्येष्ठ गझलकार श्रीराम पचिंद्रे, प्रा.डॉ.सुनंदा शेळके,प्रा.नरहर कुलकर्णी , युवराज यादव यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच त्यांनी  मराठी गझलेत घातलेली भर स्पष्ट केली. यावेळी सर्व मान्यवरांसह  अशोक वाडकर,,डॉ.दयानंद काळे, प्रवीण पुजारी आदींनी इलाही जमादार ,यांच्या गझला सादर केल्या. साईक्स एक्सटेंक्षन  येथील प्रभू कुंज या नागेशकर यांच्या बंगल्याच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.या आदरांजली सभेस डॉ.दिलीप कुलकर्णी,डॉ.दीपक बाबर, अ.बा.शेख,ओंकार पाध्ये, शीतल कोल्हापूरकर,अभय वाडकर,सुधीर कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर व गझलरसिक उपस्थित होते.


फोटो : इलाही जमादार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना सुभाष नागेशकर सोबत गझलसादचे सर्व सदस्य

Post a Comment

Previous Post Next Post