मित्रा योजना वस्त्रोद्योगाला चालना देणारी- सुरेश हाळवणकर



इचलकरंजी  :  कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने समतोल साधणारा अर्थसंकल्प आहे. विशेषतः वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क (मित्रा) निर्मितीची घोषणा वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देणारी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली आहे.

भारतातील वस्त्रोद्योग जागतिक स्पर्धेत सक्षम बनवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यासाठी मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क (मित्रा) योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात सात मेघा टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. या पार्क मध्ये सर्व सुविधा एकात्मिकरित्या उपलब्ध असतील. त्यामुळे वाहतूक व उत्पादन खर्चात मोठी बचत होईल. त्यामुळे पार्कमधून निर्मिती केले जाणारे उत्पादन जागतिक स्पर्धेत टिकू शकेल.

मित्रा योजनेतील मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क राज्य सरकारच्या सहकार्याने एक हजार एकर पेक्षा अधिक जागेवर उभारले जातील. त्यामध्ये कॉमन युटिलिटीज उपलब्ध असतील तसेच संशोधन व विकासावर भर दिला जाईल.

वस्त्रोद्योगातील नायलॉन धागे आणि सुतावरील कर 7.5% वरून 5 टक्के पर्यंत घटवण्याची घोषणा सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांपैकी एक असल्याने अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. मानवनिर्मित कापडवरील कच्चा मालावरील कर तर्कसंगत करण्याच्या दृष्टीने ही सुधारणा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.


असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी एकत्रित पोर्टल तयार करण्याची घोषणा सुद्धा अर्थमंत्र्यांनी केली असून वस्त्रोद्योगातील विशेषतः यंत्रमाग सायझिंग व प्रोसेसिंग उद्योगातील कामगार असंघटित असल्याने त्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची घोषणा आहे.

सर्व क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन कायदा लागू करण्यात आला. देशाच्या इतिहासात कामगारांसाठी घेण्यात आलेला क्रांतिकारक निर्णय आहे. गरिबांच्या घरांसाठी दीड लाखांची सवलत कायम ठेवण्यात आली आहे. उज्वला योजनेचे १ कोटी लाभार्थी वाढविण्यात येणार आहेत. पेट्रोल किमतींवर सेस लावण्यात आला असला तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री न लावता कृषी क्षेत्रासाठी निधी उभारला जाणार आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असल्यामुळे कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे अद्ययावत होतील, असा विश्वास सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केला.


Post a Comment

Previous Post Next Post