थकीत वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडीत केल्याचा जाब विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील स्टेशन रोडवरील महावितरण कंपनच्या कार्यालयात घुसून केली तोडफोड






इचलकरंजी/प्रतिनिधी :

थकीत वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडीत केल्याचा जाब विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील स्टेशन रोडवरील महावितरण कंपनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. यामध्ये कॅशियर जखमी झाला असून  अचानकपणे झालेल्या आंदोलनाने अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्य दरवाज्यासह खिडक्या आणि कॅश काऊंटरवर हल्ला करुन काचा फोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून काहीजणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दरम्यान, या घटनेचा निषेध नोंदवत महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले.

कोरोना महामारीमुळे देशभरातील सर्वच उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. त्यातच वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आर्थिक संकटात भरच पडली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने छेडत कोरोना काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी केली जात आहे. बिलमाफी मिळेल या आशेवर आणि आर्थिक टंचाईमुळे अनेकांनी जवळपास वर्षभर बिलेच भरलेली नाहीत. त्यामुळे आता महावितरण कंपनीकडून थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्याला सर्वच स्तरातून विरोध दर्शविला जात असला तरी पोलिस बंदोबस्तात वसुली सुरू आहे.

या अंतर्गतच लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील मनसेच्या एका पदाधिकार्‍याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी मनसेचे काही कार्यकर्ते स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यातूनच संतप्त कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयावरच हल्लाबोल करत कंपनीच्या मुख्यप्रवेशद्वारासह खिडक्या आणि कॅश काऊंटरसमोरील काचा फोडण्यास सुरुवत केली. त्यामुळे कार्यालयात काचा आणि विटांचा खच पडला होता. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी व अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही आंदोलकांना ताब्यात घेण्यासह हल्ल्यातील लोखंडी पाईप, खोरे, विटा, दगड आदी पोलिसांनी जप्त केल्या. मोठ्या प्रमाणात फौजफाटा दाखल झाल्यामुळे महावितरण कार्यालयास छावणीचे स्वरूप आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post