लोकशाही नव्हे ही तर ठोकशाही....



इचलकरंजी ता.१४ ,  न्याय्य मागण्यांसाठी आणि भांडवलदार धार्जिणे कायदे मागे घ्यावेत यासाठी गेले ऐंशी दिवस राजधानीला वेढा घालून  शेतकरी आंदोलन करत आहेत.त्यांची भूमिका समजून न घेता ते आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय.शेतकऱ्यांना देशद्रोही व हुल्लडबाज ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय.आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यन्त आदराचा विषय आहेत. मात्र शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची व त्यांच्या समर्थकांची सरसकट 'आंदोलनजीवी ' अशी हेटाळणी करून समस्त आंदोलन कर्त्यांनाच अपमानित केले जातआहे. हे राज्यघटनेने दिलेल्या लोकशाही अधिकार, नागरिक म्हणून असलेले मूलभूत अधिकार व अभिव्यक्ती  स्वातंत्र्य नाकारणेच आहे.ही  अतिशय निंदनीय बाब आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित  " आंदोलनजीवी देशउभारे देशभक्त असतात देशविके नव्हे " या विषयावरील साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. प्रसाद कुलकर्णी यांनी चर्चासत्राचे बीज भाषण केले.

या चर्चासत्रातून असे मत पुढे आले की, ज्या समाज माध्यमांचा अर्थात सोशल मीडियाचा गैरवापर करून ,खोटी आश्वासने देऊन आणि विकासाची स्वप्ने दाखवून केंद्र सरकार सलग दोन वेळा सत्तेवर आले. त्याच सोशल माध्यमात आता सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाची उलट तपासणी सुरू झाली आहे.आणि उक्ती व कृतीतील फोलपणा उघड झाल्याने वेगवेगळ्या पद्धतीने थयथयाट सुरू झाला आहे. बोलघेवडेपणापेक्षा जनता सुसह्य जीवनाची मागणी करू लागली आहे. हे सरकारने लक्षात घेऊन आपली धोरणे राबविणे अपेक्षित आहे.मनमानी मन की बात पेक्षा जनवाणी ऐकून घेऊन जन की बात करण्याची गरज आहे.


 या चर्चासत्रात असेही मत व्यक्त झाले की, लोकशाही व्यवस्थेत आंदोलने,निदर्शने,मोर्चा असे मार्ग अवलंबणे गृहीत असते.पण सत्याला सामोरे जाण्याची ,शंकांचे निरसन करण्याची कुवत वा धमक नसली की अशी असंस्कृत भाषा येत असते. ती भ्याड मनोवृत्तीतून अथवा हुकूमशाही विकृतीतून येत असते.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने  शेतकरी आंदोलनजीवी नसून पंतप्रधानच भांडवलदारजीवी असल्याची व ते आंदोलक आहेत जुमलेबाज नाहीत अशी टीका करून शेतकऱ्यांची हेटाळणी केल्याबद्दल माफी मागावी अशी तसेच २६  जानेवारीच्या प्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. चर्चेविना विधेयके मंजूर करून घेणे आणि त्याबाबत कोण बोलले की त्याला देशद्रोही ठरविणे हे प्रकार फार काळ चालू शकत नाहीत. सरकारला एक दोन बागलबच्या भांडवलदारांच्या ओसंडून वाहणाऱ्या तिजोऱ्या पुन्हा पुन्हा भरण्याऐवजी या देशातील अब्जावधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजेत.या देशाच्या जनतेने ब्रिटिश साम्राज्यवादाला आंदोलन करून हाकलून दिलेले आहे. दमनाला अहिंसेने उत्तर देऊन यशस्वी होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक समतेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा हा देश आहे. प्रसाद कुलकर्णी यांच्या बीज भाषणानंतर  या चर्चासत्रात शशांक बावचकर,दयानंद लिपारे,तुकाराम अपराध,राजन मुठाणे, महालिंग कोळेकर, पांडुरंग पिसे,मनोहर जोशी, बापूसाहेब भोसले यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post