"-शिवाजी कोण होता " : अरुण दळवी यांचे प्रभावी अभिवाचन
इचलकरंजी ता.२१, शहीद कॉ. गोविंद पानसरे यांच्या ' शिवाजी कोण होता ' या अतिशय गाजलेल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असललेल्या पुस्तकाचे  ज्येष्ठ रंगकर्मी अरुण दळवी यांनी आवाजातील नेमके चढउतार,मुद्राभिनय,उत्कृष्ठ शब्दफेक आणि आशयाला नेमकेपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची उत्तम शैली याआधारे

अतिशय प्रभावीपणे अभिवाचन सादर केले.आणि श्रोत्यांपुढे पानसरे यांनी मांडलेले शिवराय योग्यप्रकारे पोहोचविले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि शहीद गोविंद पानसरे स्मृतिदिन यानिमित्ताने समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या व शहीद पानसरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. माजी नगरसेवक अजित मिणेकर यांच्या हस्ते अरुण दळवी यांचे ग्रंथभेट व  गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.त्यातून शहीद पानसरे यांच्या स्मृतींचा जागर केला.तसेच समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने १९८८ साली सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या ' शिवाजी कोण होता ' या पुस्तकाच्या वाटचालीचे विवेचनही केले.तसेच  ' पानसरे कोण होता ? 'ही कविता ही सादर केली.

          अरुण दळवी यांनी या पुस्तकातील लोकशाहीत राजाचे कौतुक,राज्य संस्थापक शिवराय, रयतेच्या आत्माहुतीच्या प्रेरणा, रयतेची कणव असलेला राजा, शिवाजी व स्त्रियांची  अब्रू ,शेतकऱ्यांचे सैन्य,व्यापार उद्योगास संरक्षण,शिवाजी आणि धर्म,शिवाजी आणि मुसलमान,शिवाजी आणि सहिष्णुता, शिवरायांचे मुस्लिम सरदार,मुस्लिम राज्यकर्त्यांचे हिंदू सरदार, लूट - मोडतोड , राज्य मुख्य धर्म दुय्यम,शिवरायांच्या मराठे व हिंदू विरोधी लढाया, शिवाजी आणि अवतार ,शिवाजी आणि भवानी तलवार ,इतिहासाचा विपर्यास का केला जातो ? , शिवरायांची पत्रे व आदेश आदी विविध मुद्दे आपल्या प्रभावी अभिवाचनाने नेमकेपणे पोहोचवले.जवळ जवळ दीड तास श्रोत्यांना खिळवून ठेवणारे हे  अभिवाचन रसिकांना,कार्यकर्त्याना भावले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व  ती खबरदारी घेऊन समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिज्ञासू चांगल्या संख्येने उपस्थित होते.सचिन पाटोळे यांनी आभार मानले.


फोटो : "शिवाजी कोण होता ' चे अभिवाचन करतांना ज्येष्ठ रंगकर्मी अरुण दळवी

Post a comment

0 Comments