पर्वती येथील वादग्रस्त जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन व त्यांच्यासह 14 जणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांत .आणखी एक गुन्हा दाखल पुणे - पर्वती येथील वादग्रस्त जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन व त्यांच्यासह 14 जणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये सांगली येथील एका पत्रकाराचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यासह बऱ्हाटेविरुद्ध आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले असुन त्यांच्या टोळीविरुद्ध हा 11 वा गुन्हा आहे.

देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पर्वती येथील जमीन नीलमनी देसाई यांच्या वडिलांनी त्यांचे जावई धैर्यशील देसाई यांच्या नावावर केली होती.त्यातील काही जागा विकसित केल्यानंतर देसाई यांच्याकडे 4 हजार 913 चौरस फुट जमीन राहिली होती. 'धैर्यशील यांच्या नावावरील जागा तुमच्या नावावर करुन देतो,' असे कोथरुड येथील प्रशांत जोशी यांनी फिर्यादींना सांगितले. त्यानंतर प्रशांत याने त्यांच्याकडे 'शैलेश जगताप, जयेश जगताप व इतर ही जमीन विकत घेण्यास इच्छुक आहेत. तेच या जमिनीवर तुमच्या पतीच्या वारसांची नावे रवींद्र बऱ्हाटेकडून लावून देणार आहेत,' असे सांगितले.

शैलेश जगताप याने 'ऋषिकेश बारटक्के यांना जागा विका' असे सांगितल्यावर त्यांच्याबरोबर 5 कोटी रुपयांचा जमिनीचा व्यवहार ठरला. बारटक्के याने नीलमनी देसाई व त्यांच्या मुलीच्या नावावर 5-5 लाख रुपये जमा केले. त्यानंतर देसाई यांच्या नावाने शैलेश जगताप व इतरांनी बारटक्के याला धमकावून 20 लाख रुपये घेतले. जानेवारी 2018 मध्ये बारटक्के याने वारस म्हणून नाव लावून घेतले.

दरम्यान, 'जमिनीची मोजणी होऊन देणार नाही,' अशी धमकी देऊन आरोपींनी पैशांची मागणी केली. 'जमीन मोजणीच्या नावाखाली संजय भोकरे, शैलेश जगताप, प्रशांत जोशी व इतरांनी खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन व मारण्याची धमकी देऊन भोकरे यांच्या कर्वे रोड येथील कार्यालयात बोलावले. त्यावेळी त्यांच्याकडून 40 लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर 10 लाख रुपये रोख स्वरुपात घेतले,' असे हृषिकेश बारटक्के यांनी सांगितले. हा प्रकार प्रशांत जोशी यांना सांगितल्यावर ते फिर्यादीच्या घरी आले व या विषयाची मूळ कागदपत्राची पिशवी जबरदस्तीने घेऊन गेले. शैलेश जगताप याला फोन केल्यावर त्याने 'कागदपत्रे मिळणार नाही ती जाळून टाकू' अशी धमकी दिली.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
रवींद्र बऱ्हाटे, कथित पत्रकार देवेंद्र जैन, पत्रकार संजय भोकरे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, बडतर्फ पोलीस परवेझ जमादार, जयेश जगताप, प्रशांत जोशी, प्रकाश फाले, विशाल तोत्रे, प्रेमचंद बाफना, प्रशांत बाफना, विनय मुदरा, हरिश बाफना, राजकिरण बाफना अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खंडणी, फसवणूक, अपहार करणे, संगनमत करून गुन्ह्याचा कट रचल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नीलमणी धैर्यशील देसाई (वय 68, रा. सोमेश्‍वरवाडी पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, यापूर्वी बऱ्हाटेसह त्याच्या साथीदारावर 'मोक्का'नुसार कारवाई करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments