पुणे - थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला



पुणे - थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे. मार्च 2020 पर्यंत असणारी 278 कोटी रुपयांची थकबाकी आता तब्बल 1081 कोटी 41 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

पुणे जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीत सुमारे 36 लाख 90 हजार ग्राहक आहेत. मार्च 2019 मध्ये 5 लाख 95 हजार ग्राहकांकडे केवळ 62 कोटी 38 लाख रुपये वीज बिलांची थकबाकी होती. मार्च 2020 मध्ये 8 लाख 95 ग्राहकांकडे 278 कोटी रुपये थकबाकी होती. ती वसूल करण्यापूर्वी करोनामुळे लॉकडाऊन तेव्हापासून वीजबिल वसुलीवर परिणाम झाला आहे. अनलॉकनंतरही थकित आणि चालू बिलांचा भरणा होत नसल्याने थकबाकी आणि पर्यायाने महसुली तूट वाढत आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे.

सध्या, जिल्ह्यातील सर्व वर्गवारीतील 13 लाख 86 हजार वीज ग्राहकांकडे 1081 कोटी 41 लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचा डोंगर वाढत असतानाही महावितरणने कोणत्याही थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केलेला नाही.

ग्राहकांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. मात्र, महावितरणच्या अस्तित्वासाठी नाईलाजाने थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे. वीज ग्राहकांनी थकित आणि चालू वीजबिलांचा भरणा करावा.

- अंकुश नाळे, प्रभारी प्रादेशिक संचालक, महावितरण, पुणे .

Post a Comment

Previous Post Next Post