आज केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठकनवी दिल्ली : 
दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिल्लीतल्या कालच्या हिंसक आंदोलनानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. हिंसाचारानंतर दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिल्लीत निमलष्करी दलांच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आज अमित शाह यांनी पुन्हा बैठक बोलावली आहे. दरम्यान, शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीत अधिक निमलष्करी दले तैनात करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

या बैठकीत दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव, गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. या आंदोलनात हिंसाचाराला सुरूवात केलेल्यांचा शोध घेऊन कठोर कारवाईचे आदेश अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना दिल्याचं समजतंय. दिल्लीत सध्या अतिरिक्त 1500 ते 2000 निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आलेत.

प्रजासत्ताक दिनालाच दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यावर धाव घेत तलवारी आणि दानपट्टे फिरवले. तर काही आंदोलकांनी थेट पोलिसांच्या अंगावरच ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला.

नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे. मागच्या 63 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर पंजाब हरियाणासह देशभरातील हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

Post a comment

0 Comments