माझे कुटुंब,. माझी जबाबदारी

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मध्ये सापडले 3000 बाधित


PRESS MEDIA LIVE :  पुणे :

पुणे – “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात पुणे ग्रामीणमध्ये 2 हजार 952 बाधित सापडले. घरोघरी जाऊन केलेल्या या सर्वेक्षणातून ही बाधित संख्या समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संसर्गाची साखळी तोडण्यास मदत झाल्याचे ग्रामीण भागातील घटत्या बाधित संख्येवरून दिसून येते. सर्वाधिक बाधित हे आंबेगाव तालुक्‍यात सापडले. त्यापाठोपाठ जुन्नर, इंदापूर, हवेली आणि शिरूर तालुक्‍यात सापडले. वेळीच निदान झाल्यामुळे बाधितांचा वाढता आलेख आणि मृत्यू रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे. 

राज्यातील करोनाचा प्रादूर्भाव आटोक्‍यात यावा. यासाठी करोना बाधित व्यक्तींचे तत्काळ निदान होऊन त्याला उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासनाकडून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 8 सप्टेंबर ते 11 ऑक्‍टोबर दरम्यान पहिला टप्पा पार पडला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना पुणे शहरापेक्षा ग्रामीण आणि नगरपालिकांसाठी धोक्‍याचा ठरला आहे. या दोन महिन्यांत ग्रामीणमध्ये बाधित आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली, अशावेळी बाधितांचे तत्काळ निदान होऊन संसर्गाची साखळी तोडणे प्रशासनासमोरील मोठे आवाहन होते.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका यांच्यासह जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समितीतील कर्मचारी यांच्या माध्यमातून घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये घरात व्यक्‍ती किती, त्यांचे वाय काय, कोणी आजारी आहे का, बाधितांच्या संपर्कात आला आहात का, याची माहिती घेऊन ऑक्‍सिजन आणि शरीराचे तापमान किती याची तपासणी करत होते. त्यामध्ये संशयीत व्यक्तींना पुढील तपासणीसाठी जवळच्या केंद्रामध्ये पाठवून त्यांची तपासणी केली जात होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 1 हजार 408 ग्रामपंचायतीमधील तब्बल 33 लाख 91 हजार 252 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 27 हजार 989 व्यक्ती संशयित सापडले.

तर 23 हजार 804 जणांना सर्दी, ताप, खोकला, यासह जुना आजार असल्यामुळे त्यांची क्‍लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 हजार 952 जणांना करोनाची लागण झाले समोर आले. तर 21 हजार 251 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला.

Post a comment

0 Comments