जंबो कोविड रुग्णालय रोगापेक्षा इलाज

 जंबो कोविड रुग्णालय रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याची चिन्ह.

 

PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी.

पुणे – शहरातील करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात येणारे जम्बो कोविड रुग्णालय रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याची चिन्हे आहेत. या रुग्णालयासाठी नेमण्यात येणाऱ्या वरिष्ठ डॉक्‍टरांपासून ते वॉर्डबॉयपर्यंतच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधा 5 स्टार हॉटेलपासून 2 स्टार हॉटेलमध्ये केली जाणार आहे. यासाठी येणारा खर्च पुणे महापालिकेच्या माथी मारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून विनासुट्टी करोना नियंत्रणाचे काम करत असताना, त्यांना मिळणाऱ्या सुविधाही तोकड्या आहेत. परंतु, जम्बो हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग मात्र राजेशाही थाटात रुग्णांचे उपचार करणार आहे. पीएमआरडीए प्रशासनाकडून हे नियोजन करण्यात आले असून त्यासाठीची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात

आली आहे.

शहरातील गंभीर करोनाबाधित रुग्णांसाठी पीएमआरडीए, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सुमारे 800 बेडची सुविधा असलेले जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 700 कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असून यामध्ये वरिष्ठ डॉक्‍टर, कनिष्ठ डॉक्‍टर, टेक्‍निशियन, लॅब असिस्टंट, नर्स, वॉर्डबॉय अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हॉस्पिटलवर नेमण्यात आलेली संस्था हे कर्मचारी देणार असली तरी त्यांच्या राहण्याचा तसेच जेवणाचा खर्च महापालिकेने करायचा आहे.

             पालिकेच्या डॉक्‍टरांना केटरर्सचे जेवण…

जम्बो हॉस्पिटलच्या डॉक्‍टारांची राजेशाही दिमत ठेवण्याची तयारी सुरू असतानाच; दुसऱ्या बाजूला पालिकेच्या कोविड सेंटर आणि हॅस्पिटलमधील डॉक्‍टरांना मात्र रुग्णांसाठी दिले जाणारे जेवण आणि नाष्टा दिला जात आहे. त्यांना दररोज 12 ते 14 तास काम करून जीव धोक्‍यात घालून घरीच राहावे लागते. त्यानंतरही या डॉक्‍टरांकडून कोणत्याही तक्रारी करण्यात आलेल्या नाहीत, असे असताना जम्बो रुग्णालयातील डॉक्‍टरांसाठी फाईव्ह स्टार सुविधेचा अट्टाहास का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

                          .पदानुसार हवे हॉटेल…

या कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या तसेच जेवणाच्या सुविधेसाठी महापालिकेने सुविधा देण्याचे आदेश पीएमआरडीएकडून दिले आहेत. पहिल्या टप्प्यात 30 टक्के (सुमारे 200) कर्मचाऱ्यांच्या निवासाची सुविधा करण्याच्या सूचना महापालिकेस देण्यात आल्या आहेत. त्यात, वरिष्ठ डॉक्‍टरांची फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तर इतर डॉक्‍टरांची आणि कर्मचाऱ्यांची त्यांच्या कामाच्या दर्जानुसार, 4 स्टार, 3 स्टार आणि 2 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची तसेच जेवणाची सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जर सर्वच कर्मचाऱ्यांची हॉटेलमध्ये सुविधा केल्यास महापालिकेचे सुमारे 50 खाटांचे नवे रुग्णालय उभे राहील एवढा खर्च होण्याची शक्‍यता आहे. तर, पीएमआरडीएच्या सूचनेनुसार, महापालिकेनेही निविदा मागविल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post