पिंपरी. जम्बो कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री...


पिंपरी : जम्बो कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन


PRESS MEDIA LIVE :  पिंपरी   :  करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुंबईपाठोपाठ आता राज्यभरातही पुढील महिन्यापासून “चेस द व्हायरस’ मोहीम राबविण्यात येणार आहे. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा करोनाच्या संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर या मोहिमेत उपचार केले जाणार आहेत. करोनारूपी संकट टळावे आणि नागरिकांना निरोगी आयुष्य लाभावे, अशीच विघ्नहर्त्या गणरायाकडे मागणी करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.

अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाचे ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. करोना रुग्णांसाठी मगर स्टेडियम येथे 816 खाटांचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. सॅनिटायझेशन केल्यानंतर शनिवारपासून (दि. 29) हे रुग्णालय सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे हे कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झाले होते. खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, “पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे कार्यक्रमाला उपस्थित होते.                            

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पुणे, हैद्राबाद, गुजरात येथे करोनावरील लसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. रॅपीड अँटीजेन चाचणीनंतर आता आवाजावरूनही चाचणी घेण्याचे नियोजन आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही अल्पावधीतच जम्बो कोवीड रुग्णालय उभारणीचे काम पूर्ण केल्याबद्दल “शाब्बास पुणेकर’ असेच म्हणावे लागेल.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुण्याचा करोना रुग्णांचा मृत्यूदर अडीच टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. हा दर शून्यावर आणण्याचे आपले उद्दिष्ट आहे. करोनाने एकाही रुणाचा जीव जाऊ नये, यासाठी जम्बो रुग्णालयाची गरज होती. करोनाविरूद्धची आपली लढाई सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. संयम पाळून स्वत:बरोबरच कुटुंब आणि समाजाची काळजी घ्यायला हवी.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आपण राज्यातील 17.5 कोटी लोकांना समाविष्ठ करून घेतले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण 27 टक्के इतके आहे. तर, मृत्यूदर 2.2 टक्के इतका आहे. करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे.

Post a Comment

Previous Post Next Post