पिंपरी कॅम्पात सम-. विषमचा फज्जा.

पिंपरी कॅम्पात सम-विषमचा दुकानदारांकडून फज्जा

दोन्ही बाजूची दुकाने सुरुच – पोलिसांची बघ्याची भूमिका
PRESS MEDIA LIVE : पिंपरी :

पिंपरी – करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी- चिंचवड शहरात सम विषम तारखेस दुकाने सुरू करण्यात आली आहेत. सम तारखेला एका बाजूची दुकाने तर विषम तारखेस दुसऱ्या बाजूची दुकाने दुकानदारांनी उघडावीत असा नियम आहे. मात्र पिंपरी कॅम्पमधील दुकानदारांनी या नियमालाच धाब्यावर बसविले आहे. सर्रास दोन्ही बाजूची दुकाने सुरु ठेवण्यात येत आहेत. असे असताना तेथील बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने करोनाच्या संसर्गवाढीला हातभार लागत आहे.

शहरातील पिंपरी कॅम्प ही मुख्य बाजारपेठ आहे. येथे विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच लहान दुकाने असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी येथील दुकानांना सम विषम तारखेचा नियम घालून दिला आहे. मात्र याकडे दुकानदारांनी दुर्लक्ष केले आहे. दररोज दोन्ही बाजूची दुकाने सुरू असतात. काही ठिकाणी दुकानांचे अर्धे शटर चालू ठेवून वस्तूंची विक्री केली जाते. त्या शटरमधून ग्राहकांना दुकानात बोलावले जाते. त्यावेळी सॅनिटायजरचा वापर केला जात नाही.

तसेच कोणत्याही दुकानात साधे सनिटायजरही ठेवण्यात आलेले नाही. थर्मल स्क्रीनिंग करण्याचे तर दुकानदारांना माहितच नसल्याचे एका दुकानदारांने सांगितले. त्यामुळे याठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर करोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्‍यता आहे. यावर महापालिका व पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही. शगून चौकामध्ये बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र असे असतानाही दुकानदार सम विषम तारखेचे पालन करतात का याकडे पोलिसांचे लक्ष नाही. यामुळे करोना विषाणूचे संक्रमण वाढण्याचीही भिती व्यक्त होत आहे.

रुग्णसंख्या वाढल्यानंतरही गांभिर्याचा अभाव
या दुकानांवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनासोबतच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अधिकार देण्यात आला आहे. मात्र अतिक्रमण विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात दररोज सरासरी नऊशे ते हजार रुग्णांची भर पडत आहे. करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणाही तोकडी पडत आहे. असे असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाच प्रशासन पाठीशी घालत आहे.

कामगारांची पिळवणूक
सम-विषयचा नियम असतानाही तो न पाळता रोज दुकाने उघडली जात असली तरी कामगारांना मात्र अर्धा पगार देऊन पिळवणूक करण्यात येत आहे. हातावर पोट असणाऱ्यांना काम करण्याशिवाय पर्यायच नसल्यामुळे दुकानदारांकडून सुरू असलेली पिळवणूक सहन करण्याव्यतिरिक्त त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नसल्याचेच येथील कामगारांशी चर्चा केली असता समोर आले आहे.

दुकानदारांना अनेक वेळा नियम पाळण्याची तंबी दिली आहे. बाकी सगळीकडचे दुकानदार नियम पाळतात. मात्र पिंपरी कॅम्पमधून सतत तक्रारी येत आहेत. तेथील दुकानदार नियम पाळत नाहीत. एखाद्या दुकानदारावर कारवाई केली तरी बाजूचे दुकानदार घाबरत नाहीत. या परिसरातील दुकानदार अतिशय निर्ढावलेले आहेत. मात्र आता यापुढे अशाप्रकारे नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कडक करावाई करण्यात येणार आहे.
– अजित पवार, अतिरिक्त आयुक्त.

Post a comment

0 Comments