कोल्हापूर.सौ. छायाताई बैस ( चंदेल) यांच्या व्यसनमुक्तीच्या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

 सौ. छायाताई बैस (चंदेल) यांच्या व्यसनमुक्तीच्या उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद


PRESS MEDIA LIVE :  कोल्हापूर :  (प्रतिनिधी )

जिल्हा परिषद हायस्कूल, लोहा, जिल्हा - नांदेड येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. छायाताई बैस (चंदेल) (जन्म १९ जानेवारी १९७९) यांची व्यसनमुक्तीसाठी धडपड सुरू आहे. व्यसन हा मानवी शरीराला ग्रासलेला महाभयंकर  असा आजार आहे. दारू, सिगारेट आणि तंबाखू इत्यादी व्यसनाचे प्रकार आहेत. भारत हा तोंडाच्या कॅन्सरची राजधानी होत आहे. तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोग झाल्याने प्रत्येकवर्षी भारतात सुमारे १३.५ लक्ष लोकांचा मृत्यू होतो. तसेच अनेक प्रकारच्या  व्यसनाधिनतेने  माणसाचे संपूर्ण आयुष्य नष्ट होते तसेच कौटुंबिक प्रगती खंडीत होते. कुटुंबाच्या पदरी  दारिद्रय व नैराश्य  येते. जगभरात सुमारे १०० कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. १३ ते १५ वर्षे वयोगटातील १४ टक्क्यांपेक्षा जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक सहा सेकंदामध्ये एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. यामुळे तंबाखूचे व्यसन वेळीच थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत व्यसनाधीनतेने    पछाडलेल्या लोकांना बाहेर काढणे  आणि  व्यसनाधीनतेकडे जाणारे पाऊल रोखणे हे सामाजिक उत्थानाचे आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. 

व्यसन हे लहान वयापासून मोठ्यापर्यंत कोणालाही जडते परंतु बालवयात जे संस्कार घडवले जातात ते संस्कार माणसाच्या  आयुष्यात शेवटपर्यंत कायम राहतात म्हणूनच बालवयामध्ये मातृसंस्काराबरोबरच शालेय संस्काराला अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते.

सौ. छायाताई बैस (चंदेल) या आधुनिक सावित्रीचे व्यसनमुक्तीच्या चळवळींमध्ये स्वतःला झोकून देऊन सामाजिक कार्य अविरतपणे सुरु आहे. शालेय विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय? मानवी शरीरावर  व्यसनामुळे होणार्‍या विपरीत परिणामांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी  विविध माध्यमाचा त्या प्रभावीपणे वापर करत आहेत. ज्यामध्ये पथनाट्य, पोस्टर संदेश, भिंती चित्रे, परिसंवाद, वादविवाद स्पर्धा अशा  विविध प्रकारे विद्यार्थ्यांच्या मनावर अगदी सोप्या भाषेत व त्यांना समजेल व त्यांच्या मनाला खोलवर रुजेल अशा प्रकारे या उपक्रमांचे आयोजन करीत आहेत.

सौ. छायाताई बैस (चंदेल) या आधुनिक सावित्रीच्या सामाजिक व प्रेरणादायी कार्याची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद करण्यात आली असून; त्यांना विशेष राष्ट्रीय पुरस्कार २०२० सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. 

अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सौ. छायाताई बैस (चंदेल) यांच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या या विशेष राष्ट्रीय विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post