इचलकरंजी. प्रबोधिनीत क्रांती दिन व ग्रंथपाल दिन साजरा.


प्रबोधिनीत क्रांतिदिन व ग्रंथपाल दिन साजरा 

 

PRESS MEDIA LIVE.COM :    इचलकरंजी ( प्रतिनिधी)

इचलकरंजी ता.९ , राष्ट्राच्या सक्षम उभारणीसाठी राजकीय क्रांती इतकीच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीही अत्यंत महत्त्वाची असते. भारतीय स्वातंत्र्याच्या राजकीय क्रांतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे योगदान अतिशय मोठे आहे.त्याच पद्धतीने भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रातील ग्रंथालय चळवळीमध्ये डॉ.एस. आर .रंगनाथन यांचे  अतुलनीय योगदान आहे. म्हणूनच त्यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक असे म्हटले जाते.व त्यांचा जन्मदिन ' भारतीय ग्रंथपाल दिन ' म्हणून साजरा केला जातो,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. प्रारंभी क्रांतिवीरांना अभिवादन करून डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेला नौशाद शेडबाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच प्रबोधन वाचनालयाला दोन संगणक देणगीदाखल दिल्याबद्दल राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ,कोलकत्ता ,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय ,पुणे विभागीय ग्रंथालय कार्यालय आणि कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आणि या संगणक भेटीमुळे प्रबोधन वाचनालयाचे कामकाज अधिकाधिक गतिमान करण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला.

  या चर्चासत्रातून असे मत व्यक्त करण्यात आले की,भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वाला क्रांती दिनाने सुरुवात झाली. ब्रिटिशांना ' चले जाव 'आणि भारतीय जनतेला ' करा किंवा मरा' असा आदेश गांधीजीनी  दिला. क्रांती दिनाचा तो आशय जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आज नितांत गरज आहे. टिळक,गांधी ,पं जवाहरलाल नेहरू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांनी या देशाच्या उभारणीत व वाट चालीत अनमोल स्वरूपाचे योगदान दिले आहे. आज भारतीय संविधानातील प्रत्येक घटनात्मक मूल्यावर हल्ले होत आहेत.त्या मूल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहणे ही नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.

या चर्चेत तुकाराम अपराध,पांडुरंग पिसे,शकील मुल्ला,सचिन पाटोळे, नौशाद शेडबाळे यांनी सहभाग घेतला.तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो :डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना नौशाद शेडबाळे ,प्रसाद कुलकर्णी व इतर मान्यवर

Post a comment

0 Comments