ठाणे अवास्तव बिल प्रकरणात होरायझन प्राईम

अवास्तव बिल प्रकरणी ठाणे येथील हॉस्पिटलची नोंदणी रद्द.



PRESS MEDIA LIVE.  :. ठाणे .

मनपा प्रशासनाने आवश्यक ती व्यवस्था असल्यामुळे 'होरायझन प्राइम' या खासगी हॉस्पिटलला २ एप्रिल रोजी कोरोनावरील उपचाराचे हॉस्पिटल हा दर्जा दिला होता. मात्र अवास्तव बिल प्रकरणात कारवाई झाल्यामुळे हॉस्पिटलचा कोरोनावरील उपचाराचे हॉस्पिटल हा दर्जा कायमचा रद्द करण्यात आला. मनपाच्या निर्णयामुळे कारवाईची मुदत संपल्यानंतर (एक महिन्यानंतर) हॉस्पिटल पुन्हा सुरू झाले तरी तिथे कोरोना रुग्णांवर उपचार होणार नाही.

नवे रुग्ण दाखल करुन घेण्यास मनाई

मनपाने हॉस्पिटलच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी एक निरीक्षक नियुक्त केला आहे. कारवाईची मुदत संपेपर्यंत (एक महिना) हॉस्पिटलमध्ये नवे रुग्ण दाखल करुन घेतले जाणार नाही. मात्र आधीपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.मनपा प्रशासनाने सुरू केली बिलांची तपासणी
ठाणे मनपाचे आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी शहरातील हॉस्पिटलच्या मोठ्या रकमेच्या बिलांचे लेखा परीक्षण (audit/ऑडिट) करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार ऑडिट सुरू केल्यानंतर काही दिवसांतच मनपा प्रशासनाने १९६ कोरोना रुग्णांना उपचारासाठी अवास्तव बिल आकारण्यात आल्याचा ठपका संबंधित हॉस्पिटल प्रशासनावर ठेवला. यातील ५६ प्रकरणे 'होरायझन प्राइम' एकाच हॉस्पिटलशी संबंधित होती. या बिलांची एकूण रक्कम ६ लाख ८ हजार ९०० रुपये एवढी होती. ही बाब लक्षात आल्यामुळे हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली.

'होरायझन प्राइम'मध्ये १२ जुलैपर्यंत ७९७ कोरोना रुग्णांवर उपचार झाले होते. यापैकी ५७ जणांनी ऑडिटसाठी बिलं पाठवली होती. ऑडिट केल्यावर ५६ प्रकरणात अवास्तव बिल आकारण्यात आल्याचे आढळले. यामुळे कारवाई करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मनपाचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.  नियमानुसार हॉस्पिटल प्रशासनाला नोटीस पाठवून २० जुलै रोजी जाब विचारण्यात आला आणि स्पष्टीकरण देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. मुदत संपली तरी हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने हॉस्पिटलवर कारवाई केली आहे. कारवाई झाली तरी त्याविरोधात एक महिन्याच्या आत हॉस्पिटल प्रशासन दाद मागू शकते. मनपाच्या नियमानुसार दाद मागण्याचा पर्याय हॉस्पिटलकडे उपलब्ध आहे.

'होरायझन प्राइम' हॉस्पिटलची भूमिका

'होरायझन प्राइम' हॉस्पिटलने शुक्रवारी २४ जुलै रोजी स्पष्टीकरण पाठवल्याची माहिती दिली. मात्र स्पष्टीकरणाबाबत सविस्तर माहिती देणे टाळले. मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करू, त्यांना आमची बाजू सांगू आणि तोडगा काढू, असा विश्वास हॉस्पिटल प्रशासनाने व्यक्त केला. सर्व रुग्णांना सरकारी नियमानुसार बिलं आकारण्यात आली आहेत. ज्या रुग्णांवर उपचार केले त्यांच्यापैकी ५० जण महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी होते. या रुग्णांना बिलात मोठी सवलत दिल्याचेही हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. काही रुग्णांची स्थिती गंभीर होती. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जास्त दक्षता घ्यावी लागली तसेच विशेष वैद्यकीय व्यवस्था करावी लागली. यामुळे त्यांना मोठे बिल आकारण्यात आले. या संदर्भात काही तक्रार असल्यास मनपा अधिकाऱ्यांना भेटून योग्य ते स्पष्टीकरण देण्याची तयारी आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. निर्जंतुकीकरण, जैव कचऱ्याचे व्यवस्थापन यासाठी हॉस्पिटलला मोठा खर्च करावा लागत आहे. कोरोना संकटाच्या काळात या खर्चात वाढ झाली आहे. या खर्चाचे नियोजन रुग्णांकडून बिलांचे पैसे मिळाल्याशिवाय होऊ शकत नाही, असेही हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. ठाणे मनपा हद्दीतील १५ खासगी हॉस्पिटलची चौकशी ठाणे मनपाचे मुख्या लेखा परीक्षक (ऑडिटर) किरण तायडे यांच्या नेतृत्वाखाली १५ खासगी हॉस्पिटलच्या बिलांची तपासणी सुरू आहे. तपासणीसाठी आलेल्या १७५२ बिलांपैकी ४८६ बिलांची तपासणी झाली आहे. यातील १९६ बिलांमध्ये अवास्तव आकारणी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अवास्तव आकारणीचा ठपका ठेवलेल्या बिलांची एकूण रक्कम २७ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Post a Comment

Previous Post Next Post