शिरोळ जिल्हा कोल्हापूर :


शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे ग्रामीण रुग्णालयास शासनाकडून मान्यता.

 30 कोटी रुपये खर्चाचे अद्ययावत रुग्णालय उभारले जाईल__ मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर



PRESS MEDIA LIVE :  शिरोळ :

शिरोळ तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी उदगाव येथे शशिकला क्षयरोग आरोग्य धामच्या आवारात ग्रामीण रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जवळपास 30 कोटी रुपये खर्चाचे अद्यावत रुग्णालय उभारले जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.  शिरोळ तालुक्यामध्ये अद्ययावत असे ग्रामीण रुग्णालय उभारले जावे अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. सर्वसामान्य जनतेला शासकीय रुग्णालयामधून अद्ययावत अशी रुग्णसेवा मिळावी यासाठी सुसज्ज ग्रामीण रुग्णालय तालुक्यात व्हावे अशी आग्रही मागणी राज्यशासनाकडे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली होती. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज शासन परिपत्रकाद्वारे उदगाव तालुका शिरोळ येथे शशिकला क्षयरोग आरोग्य धामच्या आवारात ग्रामीण रुग्णालय उभारण्यास मान्यता दिली.

यापूर्वी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे स्थलांतरीत करण्यासंदर्भात मागील शासनाने निर्णय घेतला होता. तो निर्णय रद्द करुन जयसिंगपूर आरोग्य केंद्र सध्या आहे तेथेच सुरु राहील व उदगाव येथे नव्याने ग्रामीण रुग्णालय उभारले जाईल, असा शासन निर्णय झाला असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले  . उदगाव येथे होणाऱ्या या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी जवळपास 29 कोटी 76 लाख अंदाजपत्रकीय रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळावी व अनुदान उपलब्ध व्हावे यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून सहसंचालक आरोग्य सेवा, मुंबई यांच्याकडे दि.28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रस्ताव सादर केला असून लवकरच प्रशासकीय मान्यता व बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल व रुग्णालयाच्या बांधकामास प्रत्यक्षात सुरुवात होईल, असेही आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post