पिंपरी फी साठी तगादा पिंपरी शहरातील 19 खाजगी शाळांना नोटीस.

फी साठी तगादा : पिंपरी शहरातील १९ खासगी शाळांना नोटीस

फी साठी तगादा : समाधानकारक खुलासा न केल्यास होणार कारवाई.

 
PRESS MEDIA LIVE. :    पिंपरी : 

पिंपरी – शहरातील शाळा कधी सुरू होणार याबाबात अद्याप काहीही माहिती नाही. असे असतानाच शाळेत प्रवेश घेऊन नवीन शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण शुल्क भरावे यासाठी खासगी शाळांनी तगादा लावला आहे. शासनाने शुल्कासाठी सख्ती करु नये, असे आदेश दिलेले असतानाही शाळांकडून वसुली सुरु आहे. शहरातील 19 खासगी शाळांना याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.

करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कामांवर करोनाचा दुष्परिणाम जाणवज आहे. सर्वसामान्य यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. शहरातील अनेक खासगी शैक्षणिक संस्थांनी पालकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत काहीच माहिती नसताना संस्था प्रवेश घेण्यासाठी तगादा लावत आहे. त्यासाठी पालकांना थेट फोन करून पाल्याचा प्रवेश निश्‍चित करण्यासाठी फी भरण्याचा आग्रह केला जात आहे. वर्ष वाया जाण्याची भीती

शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावर अद्याप काहीच निर्णय झाला नाही. मात्र शैक्षणिक संस्था शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यासारखे प्रवेश प्रक्रिया राबवून प्रवेश निश्‍चित करू लागले आहेत. विशेषतः इंग्रजी माध्यमातील ज्यूनिअर के जी, केजी, यासोबतच पहिली ते पाचवीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पालकांना फोन करून शाळेत बोलावले जात आहे. तसेच शाळेत येऊन फी भरून तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्‍चित करा. नंतर प्रवेश पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. परिणामी तुमच्या पाल्याचे वर्ष फुकट जाईल अशी भीती दाखवली जाते. सामान्य पालकांची परवडआपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी पालक त्यांना खासगी संस्थेत प्रवेश घेऊन देतात. यावर्षी मात्र अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे एवढे शुल्क भरणे पालकांना शक्‍य नाही. असे असतानाही फीसाठी संस्थाकडून तगादा लावण्यात येत आहे. या शाळांचे शुल्क सामान्यांना परवडणारे नाही. पुस्तके, गणवेश खरेदी करण्यास सांगत आहेत. शाळा कधी सुरू होणार याबाबत मात्र त्यांच्याकडे कसलेही उत्तर नाही. जर शाळा सुरू होणार नसतील तर मग आताच शुल्क का मागता अशी विचारणा पालक करत आहेत.

या शाळांविरुद्ध तक्रारी
शहरातील एसएनबीपी स्कूल रहाटणी व मोरवाडी, एल्प्रो स्कूल चिंचवड, न्यू पूना पब्लिक स्कूल निगडी प्राधिकरण, बचपन स्कूल दिघी, होली स्कूल पिंपळे सौदागर, आरएमडी स्कूल वाल्हेकरवाडी, साधू वासवानी स्कूल मोशी, ऑर्किड स्कूल निगडी, व्हिग्योर स्कूल पिंपळे सौदागर, विस्डम स्कूल विकासनगर किवळे, सेंट जोसेफ स्कूल विकासनगर किवळे, व्हिब्ग्योर स्कूल चिंचवडगाव, युरो किडस स्कूल चिंचवडगाव, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल वाकड, व्हिब्स स्कूल विकासनगर किवळे, सेंट ऍन्ड्रयूज स्कूल चिंचवड, जयहिंद प्रायमरी स्कूल पिंपरी, डी वाय पाटील पब्लिक स्कूल पिंपरी या शाळांबाबत पालकांनी तक्रारी दिल्या आहेत.

शाळांनी पालकांना संकटातही लुटायचा धंदा सुरू केला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फी उकळतात. यावर्षी तसी परिस्थिती नाही. करोनाच्या संकटामध्ये अनेकांचे रोजगार केले आहेत. अर्थिक चणचण आहे. शासनाने अद्याप शाळा कधी सुरू होणार हे सांगितलेले नाही असे असताना शैक्षणिक संस्था फी कशी मागू शकतात. वर्षाचे दोन महिने तर गेले आहेत. फी मागताना संपूर्ण फी मागितली जात आहे. जर दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असतील आम्ही सहा महिन्याची फी भरायला तयार आहे. मात्र आता 50 ते 90 हजार रुपये कुठून आणायचे.
– एक पालक

या तक्रारी लेखी स्वरुपात पालकांनी शिक्षण विभागात मेलद्वारे पाठविल्या आहेत. या शाळांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांनी समाधानकारक खुलासे केले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही अशाप्रकारे पालकांची फसवणूक करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल.

– ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी

Post a comment

0 Comments