इचलकरंजी :


    कोरोनोत्तर जगाची मांडणी करताना भगतसिंग मार्गदर्शक ठरतील : प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

PRESSMEDIA LIVE :

इचलकरंजी ता.१० शहीद भगतसिंग हे सर्वांगिण शोषणाविरुद्ध लढणारे लढवय्ये व्यक्तिमत्व होते. सामाजिक व राजकीय क्रांतीचा ज्वालामुखी असलेल्या भगतसिंगांनी विषमता विरहीत समताधारी समाजवादी जगाचे स्वप्न पाहिले. भगतसिंगांची तत्त्वनिष्ठा आणि साम्राज्यवाद विरोधी भूमिका अतिशय प्रखर होती.  त्यांनी जनतेसाठी जनतेकडूनच क्रांती व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांची बुद्धिप्रामाण्यवादी ,विवेकवादी विचारधारा आणि नव्या विश्वाच्या निर्मितीचे स्वप्न ही ध्येये उराशी घेऊन त्यासाठी कृतिशील होण्याची जबाबदारी  युवकवर्गाने स्वीकारली पाहिजे.कोरोनोत्तर जगाची पुनर्मांडणी करतांना शहीदभगतसिंग मार्गदर्शक ठरू शकतात असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन(एआयएसएफ ) आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) कोल्हापूर ,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चार दिवसीय ऑनलाइन बौद्धिक शिबिराचा समारोप करताना प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
                     प्रसाद कुलकर्णी म्हणाले, भगतसिंगाच्या क्रांती विचारात ध्येयवाद ,विज्ञाननिष्ठा, गतिशीलता, आणि शोषणाचे समूळ उच्चाटन यांना प्राधान्य होते. अन्यायकारी व्यवस्थेत त्यांना बदल हवा होता. ज्या व्यवस्थेत सर्वसामान्य माणसाला घातक संकटांचा सामना करावा लागणार नाही तसेच शोषित वर्गाच्या अस्तित्वाला मान्यता असेल ही व्यवस्था ते आणू पहात होते.  मानवजातीला भांडवलशाहीच्या विळख्यातून आणि साम्राज्यवादाच्या युद्धातून वाचवू शकेल अशी क्रांती त्यांना अपेक्षित होती. माणसाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आणि त्याच्या  प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी क्रांतिकारी शक्ती जिवंत असणे महत्त्वाचे असते. ती शक्ती युवा वर्गाने कृतीशीलता दाखवत जोपासली पाहिजे. स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी फासावर जाणाऱ्या शहीद भगतसिंग यांचा हाच जीवन संदेश होता.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या मांडणीत शहीद भगतसिंग यांच्या जीवन व कार्यकर्तृत्वावर विस्तृत प्रकाश टाकला.
                        चार दिवस चाललेल्या या ऑनलाईन बौद्धिक शिबिराचे उद्घाटन उमाताई पानसरे व बी .एल.बर्गे यांनी केले.या शिबिरात गिरीश फोंडे ,राजु देसले ,राजन क्षीरसागर ,प्राचार्य आनंद मेणसे ,प्रा. युगल रायलू, प्रा.श्रीनिवास खांदेवाले, अनिल चव्हाण,सीमा पाटील यांनी विविध विषयावर मांडणी केली. शिबिराचा समारोप प्रसाद कुलकर्णी यांच्या "भगतसिंग: जीवन व कार्य " या विषयावरील मांडणीने झाला. या शिबिराचे आयोजन गिरीश फोंडे, प्रशांत आंबी ,जावेद तांबोळी, धीरज कठारे ,आरती रेडेकर, हरीश कांबळे, आदींनी केले होते.
                        

फोटो : ऑनलाइन बौद्धिक शिबिरात बोलताना प्रसाद कुलकर्णी

Post a Comment

Previous Post Next Post