इचलकरंजी :


लॉककडाऊन हा पर्याय सर्वांना  अडचणीत टाकणारा ठरू शकतो.


PRESS MEDIA LIVE :. इचलकरंजी : ( मनु फरास ) :

इचलकरंजीत कोरोना संसर्ग वाढत चालल्याने लागू करण्यात आलेला लॉकडाऊन उद्या, मंगळवारी संपत आहे. विशेष म्हणजे या काळातच शहरातील कोरोनाबाधितांची संख्या सव्वाशेवर पोहोचली. लॉकडाऊनमुळे वस्त्रनगरीची धडधड थांबली असून शहराचे अर्थकारणच ठप्प झाले आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लागू करण्याने कोरोनाला कसा अटकाव बसणार, असा प्रश्‍न असून वारंवार लॉकडाऊनचा पर्याय न अवलंबता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.  मार्चच्या मध्यापासून सुरू झालेला लॉकडाऊनचा पर्याय तीन महिने कायम आहे. अनलॉक 1 व 2 चे काही दिवसांचे टप्पे वगळता वस्त्रनगरीची धडधड ठप्प आहे. संपूर्ण शहराचे अर्थकारण वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. या उद्योगाची चक्रेच ठप्प झाल्याने सर्वसामान्य कामगार, रोजंदारीवरील पोट असलेले नागरिक यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वस्त्रोद्योग पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन उद्या मंगळवारी संपत आहे. आता पुढे काय, असा प्रश्‍न इचलकरंजीकरांना सतावत आहे.

लॉकडाऊन काळातच शहरातील रुग्णसंख्या सव्वाशेवर पोहोचली आहे. लॉकडाऊन काळात शुक्रवारी शिथिलता देण्यात आली. पण नागरिकांची खरेदीसाठी बाजारात अक्षरश: झुंबड उडाली. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णयालाच हरताळ फासला गेला. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आहे, हा उद्देशच लोकांना समजत नसेल तर पुन्हा पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यातून काहीही साध्य होणार नाही. प्रशासनाचे नियोजन कमी पडले की लोकांना अजूनही कोरोनाचे गांभीर्य नाही, असा निष्कर्ष काढला तरी शुक्रवारी जो गोंधळ उडाला तो शहराला संकटाच्या खाईत लोटणारा आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहर किती दिवस बंद ठेवायचे असा प्रश्‍न आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढवला तरी संसर्ग वाढणारच नाही याची शाश्‍वती नाही. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असे सर्वसामान्य लोकांना वाटले नाही तरच नवल! उद्योग बंद असल्याने लोकांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न तयार झाला आहे. लोकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना वितरित करण्यात मदतही दिसेनाशी झाली आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन हा पर्याय लोकांना अडचणीत टाकणारा ठरू शकतो.

Post a comment

0 Comments